श्रावणात तरी मंदिरे खुली करा; खैरेेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र
करोनाच्या प्रादुर्भावामुळे अर्थव्यवस्थेची विस्कटलेली घडी पुन्हा सुरळीत करण्यासाठी राज्यात लॉकडाऊननंतर मिशन बिगिन अगेन अंतर्गंत अनेक व्यवसायांना परवानगी देण्यात आली आहे. असे असले तरी मात्र, अद्याप जिम, उद्यानं आणि मंदिरे नागरिकांसाठी बंदच ठेवण्यात आली आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते आणि खासदार चंद्रकांत खैरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहलं आहे. श्रावण महिना सुरू झाला आहे, त्यामुळे मंदिरे खुली करा, असं त्यांनी पत्रात म्हटलं आहे. ’हिंदू बांधवांचा श्रावण महिना सुरु झाला आहे. या महिन्यात फक्त भाविकांसाठी मंदिरे उघडली जावी. मंदिरे बंद असल्याने धार्मिक कार्य करण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत. मंदिरे उघडल्यास भाविक सोशल डिस्टनसिंगचे नियम पाळून धार्मिक कार्य करतील,’ असे ते म्हणाले आहेत.